
माझ्या रचना, माझे शब्द
वाचून मला काहीजण म्हणाले
मित्रा तू झालास कवी
पण........
पण.... मी कवी नाही!
कारण माझ्या रचना, माझे शब्द
म्हणजे कवीचे काव्य नाही
माझे शव्द, रचना म्हणजे
माझ्या भावना आहेत
माझ्या ह्रदयाच्या व्यथा आहेत
एकतर्फी प्रेमाच्या कथा आहेत
याच एकतर्फी प्रेमात
मनात जन्मलेल्या भावनांना
काव्याचं स्वरुप देऊन
शब्दसूरांच्या मार्गाने
मी कागदावर उतरवले
माझ्या या रचना म्हणजे
तिच्या आठवणीचे
पुरावे आहेत
तिच्यासाठी वेचलेले
माझ्या प्रेममय आयुष्यातील
अनमोल आनंदाचे क्षण आहेत
याला मी काव्य कसे म्हणू?
म्हणूनच मी कवी नाही!
कवी लिहितो,
मनातले विचार कागदावर मांडतो
पण मी............
कागदावर उतरवतो
माझा प्रेमावरचा अतूट विश्वास
कधीही पूर्ण न होणारं माझं स्वप्न
माझ्या रचना म्हणजे
माझं जीवन आहे, कारण
माझे शब्द्, माझ्या रचना
माझ्या श्वासात सामावल्या आहेत
याला मी काव्य कसे म्हणू?
म्हणूनच मी कवी नाही!
-:रवि विश्वासराव (कवी)
(मीच माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)
No comments:
Post a Comment