!! आजचे सुभाषित !!

!! आजचे सुभाषित !!
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

Monday, May 31, 2010

तुला कसा विसरू?


जीवनात अशा काही
व्यक्ती येतात आणि
अशी नाती बनवून जातात कि
ती नाती विसरता येत नाहीत
आपलं नातं हि याचपैकी
एक आहे - प्रेमाचं
मग मी तुला कसा विसरू शकतो!
तुझ्या आठवणी
हळुवार पावलांनी माझ्या
हृदयाचे दरवाजे ठोकवतात
माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर
तुझीच स्वप्न राज्य करतात
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
माझ्या ओठांवर सदैव
तुझ्याच गोष्टी असतात
डोळ्यात तुझीच स्वप्न
हृदयात तुझीच मूर्ती
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
तुझ्याविना जगणं, हा
विचारच मला सोसवत नाही
कारण, माझं अस्तित्व, माझं जीवन
माझं आयुष्य, माझं सर्वस्व
तुझ्यावरच अवलंबून आहे
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
मित्रांसकट तुही म्हणालीस
"मला विसर" म्हणून
पण तुला कसा विसरू हेच
मला कोणी संगत नाही
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
तुझा विरह सोसनं म्हणजे
माझ्यासाठी तर ती
जीवघेणी शिक्षा आहे, तरीही
तुझा विरह सोसेन मी
पण, पुन्हा बोलू नकोस
मला विसर म्हणून
कारण मी तुला विसरू शकत नाही!
तुला विसरणं माझ्यासाठी फारच कठीण आहे
कारण माझं पाहिलं प्रेम
तूच आहेस आणि
पाहिलं प्रेम विसरणं इतकं
सोपं असतं का?
नाही ना...... मग
तूच संग मला आता
मी तुला कसा विसरू शकतो!
- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असं एकटा! - काव्यसंग्रह)

Friday, May 28, 2010

प्रेमाचा रंग !


प्रेम तुझा रंग कसा?
हृदयातूनी उमलला जसा
रंग तुझे आहेत वेगळे
रूप तुझे आहे निराळे
जगावेगळा आभास तुझा
तुझ्याविना जीवन आहे सजा
प्रेम तुझा रंग कसा?
चेहर्यावर चंद्रकला उमलते
ओठांवरती हास्य उमटते
इंद्रधनुचे सप्तरंग पाहुनी
बागेत मोगरा फुलाला जसा
प्रेम तुझा रंग कसा?
नयनांचा हा खेळ निराळा
शब्दांनाही नसतो आळा
घाव करितो हृदयावरती
मनामधला भाव जसा
प्रेम तुझा रंग कसा?
वात्सल्याचा आपुलकीचा
नाजूक रेशीम धागा जसा
दोन शरीरात विश्वासाचा
एकच आत्मा वसला जसा
प्रेम तुझा रंग कसा?
- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असं एकटा! - काव्यसंग्रह)

आठवण


प्रिये...
जेव्हा जेव्हा तू श्वास घेशील
बोलण्याशी तोंड उघडशील
तेव्हा तुला माझीच आठवण येईल
समुद्राच्या उसळणार्या लाटा पाहून
गुलाबाचं रक्षण करणारा काटा पाहून
बघ तुला माझीच आठवण येईल
पावसाच्या धारा जेव्हा
उन्हाळ्यानंतर धरतीवर पडतात
तेव्हाचा तो सुकलेल्या
मातीचा वास अनुभव आणि
बघ तुला माझीच आठवण येईल
सूर्य जेव्हा उगवतो
सूर्य जेव्हा मावळतो
तेव्हा सूर्याच आपल्या
कार्यकुशलतेवरच प्रेम पाहून
बघ तुला माझीच आठवण येईल
जेव्हा एखादी मधमाशी
थेंबाएवढ्या मधासाठी
वेगवेगळ्या फुलांवर भिरभिरते
मध जमा करते तेव्हा
त्या माशीच मधासाठी आतुरणं पाहून
बघ तुला माझीच आठवण येईल
तू असं कर नाहीतर तू तसं कर,
तू हे बघ नाहीतर तू ते बघ,
तू इथे जा नाहीतर तू तिथे जा
तुला तुझ्या प्रत्येक
पाऊला पाउलांवर
बघ तुला माझीच आठवण येईल
-रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा!- काव्यसंग्रह)

Thursday, May 27, 2010

स्वा. विनायक दामोदर सावरकर

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्य जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

वीर सावरकरांनीच पुढे दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट

ग्रंथ आणि पुस्तके

वीर सावरकरांनी ,००० च्या हुन जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. क्वचितच कोणी इतर मराठी लेखकाने इतका अमुल्य ठेवा मराठी भाषेला दिला असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.

इतिहास

  • १८५७ चे स्वातंत्र्यसमर (इ.स. १८५७ च्या युद्धाचा स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास, पहिल्यांदा त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जोडला)
  • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  • हिंदुपदपादशाही

कथा

  • सावरकरांच्या गोष्टी भाग - १
  • सावरकरांच्या गोष्टी भाग - २

कादंबरी

  • काळेपाणी
  • मला काय त्याचे

आत्मचरित्रपर

  • माझी जन्मठेप
  • शत्रूच्या शिबिरात
  • अथांग( आत्मचरित्र पूर्वपीठिका)

लेखसंग्रह

  • मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना - अनुवादित
  • गांधी गोंधळ
  • लंडनची बातमीपत्रे
  • गरमागरम चिवडा
  • तेजस्वी तारे
  • जात्युच्छेदक निबंध
  • विज्ञाननिष्ठ निबंध
  • स्फुट लेख
  • सावरकरांची राजकीय भाषणे
  • सावरकरांची सामाजिक भाषणे

नाटके

  • संगीत उ:शाप
  • संगीत संन्यस्त खड्‌ग
  • संगीत उत्तरक्रिया
  • बोधीसत्व- (अपूर्ण)

कविता

महाकाव्ये

  • कमला
  • गोमांतक
  • विरहोच्छास
  • सप्तर्षी

स्फुट काव्य

  • सावरकरांच्या कविता

तो आणि ती!


प्रेमाची व्याख्या
प्रेमाची भाषा
प्रेमाचा विश्वास तर
प्रेमाचा आत्मा म्हणजे
तो आणि ती!
त्यातला तो म्हणजे पूर्व
तर ती म्हणजे पश्चिम
दोघेही भिन्न स्वभावाचे
तरीही एकमेकांवर
जिवापाड प्रेम करणारे
तो आणि ती!
प्रेमाची साथ
जीवनाची गाठ
फिरवत नाही कधी
एकमेकांपासून पाठ
कारण दोघांची
एकाच पाउलवाट
तो आणि ती!
त्या दोघातली ती
रुसलीच कधी त्याच्यावर
तर तो देऊन गुलाब
समजूत काढतो तिची, असे
तो आणि ती!
दोघेही सापडलीच कधी
अडचणीत तर
सखी बनून त्याची
ती साथ देते त्याला
आणि सखा बनून तिचा
तो साथ देतो तिला, असे
तो आणि ती!
दोघांची या असली
भिन्न शरीरे जरी
तरी वसला आहे त्यांच्यात
एकचं आत्मा त्यांच्या प्रेमाचा
असे आहेत दोन जीव
एकमेकांवर जीवापाड
प्रेम करणारे....
तो आणि ती!
-रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा!- काव्यसंग्रह)

Monday, May 24, 2010

सुविचार 1

सुविचार - २६ ते २८

मराठी सुविचार पुढील भाग -
  • २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
  • २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
  • २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
  • २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
  • ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
  • ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
  • ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
  • ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
  • ३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
  • ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
  • ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
  • ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
  • ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
  • ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
  • ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
  • ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
  • ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
  • ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
  • ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
  • ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
  • ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
  • ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
  • ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
  • ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
  • ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते।
क्रमश:

Friday, May 21, 2010

सुविचार!


सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.

आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...

पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

सुविचार - १ ते २८

  • १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  • २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
  • ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
  • ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
  • ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
  • ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
  • ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
  • ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
  • १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
  • ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
  • १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
  • १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
  • १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
  • १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
  • १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
  • १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
  • १८) आधी विचार करा; मग कृती करा.
  • १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
  • २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
  • २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
  • २२) अतिथी देवो भव ॥
  • २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
  • २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
  • २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
  • २५ अ) तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे.
  • २५ ब) स्त्रिया या प्रथमतः स्त्रियाच असून, त्या ज्याक्षणी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व धारण करतील, त्याक्षणी हे जग सर्वार्थानं वेगळं अधिक सुंदर, अधिक आनंदमय होईल
  • २५ क) एखाद्यास शिष्टाचाराने हरविणे म्हणजे सर्वात मोठा विजय प्राप्त करणे.
क्रमश:

होळी (पालखी) उत्सव




आमच्या गावी मुक्काम कुरंग, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे साजरा झालेला होळी (पालखी) उत्सव त्या क्षणाच्या काही आठवणी या विडीयोतून.
- रवि विश्वासराव (कवी)
(आठवणींच्या खजिन्यातून)

Tuesday, May 18, 2010

तुला पहिले मी....


डोळ्यांतून दाखवताना
मनात सारे लपविलेले
ऐकविताना शब्द मजला
ओठांवर न आलेले
तुला पहिले मी....
पाहताच मला कोठे
बिथरून तुझे जाणे
नजर चुकविता मजपासुनी
पाय तुझे थरथरलेले
तुला पहिले मी....
जगावेगळी अदा तुझी
होकार असूनही नकार देसी
फसवुनी उभ्या जगाला
कोडे प्रेमाचे घातलेले
तुला पहिले मी....
शब्द माझे बहरून येती
तुझ्याच सप्त सुरांतुनी
रुसवा फुगवा धरून मनी
गीत माझे गायलेले
तुला पहिले मी....
सुखात माझ्या हसणे अन
दु:खात अश्रू ढाळताना
धरून उगाच मनी अबोला
नाजूक बहाणा करताना
तुला पहिले मी....
चुकताना पाऊल माझे
तूच आलीस सावरायला
लपवूनी ते अपराध माझे
जगसामावेत भांडताना
तुला पहिले मी....

- रवी विश्वासराव (कवी)
(स्वप्नांच्या वाटेवरती - काव्यसंग्रह)

Monday, May 17, 2010

तुळजापूरची तुळजाभवानी....


महाराष्ट्राची शक्तीदायिनी अशी जिची ख्याती ती आदिशक्ती तुळजाभवानी! शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान! अशा या तुळजाभवानीचे ठिकाण असलेले तुळजापूर म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुजनीय. तुळजापूर हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तुळजाभवानीचे मंदिर बालाघाट डोंगराच्या एका पठारावर बांधण्यात आले आहे. तुळजा या शब्दाचा मूळ अर्थ 'तात्काळ मदतीला येणारी' असा सांगतात. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असेही सांगितले आहे.

या देवीच्या उत्पत्तीमागे अशी कथा सांगितली जाते की, कृतयुगामध्ये या भागात कर्दम ऋषींचा आश्रम होता. त्यांची पत्नी होती अनुभूती. कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर अनुभूतीला सहगमन करायचे होते. पण ती त्यावेळी गर्भवती असल्याने तिला तसे करता आले नाही. म्हणून तिने मुलगा मोठा होऊन गुरुगृही गेल्यानंतर देवीच्या तपश्चर्येला प्रारंभ केला. या तपश्चर्येच्या काळात कुकूर नावाच्या राक्षसाची नजर अनुभूतीवर पडली. त्या राक्षसापासून स्वत:ला वाचविण्यासाठी तिने देवीची प्रार्थना केली आणि अष्टभूजेच्या रुपात देवीने प्रगट होऊन तिचे रक्षण केले. तिथेच देवीने वास्तव्य केले. हेच ठिकाण तुळजापूर नावाने पुढे प्रसिध्द झाले.

या मंदिरात जाण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये ९० पायर्‍या चढाव्या लागतात. काही पायर्‍या चढून गेले की इथे एक कल्लोळ तीर्थ नावाचं कुंड दिसतं. सर्व तीर्थांना इथे प्रगट व्हायचे होते आणि त्यांनी एकच कल्लोळ केला, असं म्हणतात. म्हणून या तीर्थाचे नाव कल्लोळ तीर्थ पडले आहे. त्यानंतर भेटतं ते गोमुख तीर्थ. याशिवाय इथे गणेश तीर्थ, अमृतकुंड हे कुंडही आहेत. याशिवाय मंदिराकडे जाताना विठ्ठल, दत्तात्रय, सिध्दीविनायक यांची मंदिरे लागतात.

मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवर्‍या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे, असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही अष्टभूजा असून तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युध्दाच्या तयारीत असलेल्या या अष्टभूजेचे हे रौद्र रुप तरीही विलोभणीय आहे.

या मंदिरात देवीची चार वेळा पूजा केली जाते. याशिवाय देवीचे नवरात्र हा सर्वात मोठा उत्सव असतो. याशिवाय गुढीपाडवा, ललितापंचमी, बलिप्रतिपदा, मकरसंक्रांत, शिलाष्टमी आणि रथसप्तमी या दिवशी देवीची महापूजा असते.

या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशादर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी ही तुळजाभवानी आहे. म्हणूनच ती महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.

जय जय अष्टभूजा नारायणी हो !
दुर्गा, भवानी, तुळजा, तुझी तुळजापुरी देखीली हो!
असे म्हणताना त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे मस्तक नमते आणि बाहू स्फुरतात ते यामुळेच!

मी आणि माझी कविता!


अंतकरणातून तुलाच
सर्वस्वी आपलं मानून
तुझ्याच स्वप्नात रंगून
नेहमी तुझ्या आठवणीने
तळमळत असतो
मी आणि माझी कविता!
माझं काव्य फक्त
तुझ्याचसाठी आहे
त्यात आपल्या प्रीतीचे
मधुर स्वर आणि भावना
एकवटल्या आहेत, म्हणूनच
तुझ्या विरह क्षणात तुला
काव्यातूनच अनुभवत असतो
मी आणि माझी कविता!
तुझ्यावर काव्य करण्यासाठी
सदैव शब्द कमी पडतात
कुठे अडखळलोच जर मी
तर काव्य पूर्ण करण्यासाठी
सदैव एकमेकाला मदत करतो
मी आणि माझी कविता!
तुझ्या विरहाचा गुंता सोडवून
तुझा विरह दूर करण्यासाठी
एकमेकांच्या सोबतीने आम्ही
सदैव प्रयत्न करत असतो
मी आणि माझी कविता!
तू नसलीस कि मला
सोबत होते शब्दांची
आणि एकतर्फी प्रेमात
निर्माण झालेल्या काव्याला
सोबत होते माझी,
का तर....
तुझ्याविना काहीच
अस्तित्व नसल्याप्रमाणे आहोत
मी आणि माझी कविता!

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

प्रेम का होतं?


मन हे वेडं असतं
एखादी व्यक्ती आवडली
कि तिच्यावर प्रेम करून बसतं
पण.... मला हे कळत नाही
प्रेम का होतं?
डोळ्यांतून नेहमी
अश्रू वाहण्यासाठी कि,
हृदयाला सतत
वेदना देण्यासाठी
प्रेम का होतं?
त्या व्यक्तीच्या विरहाने
जीवनाचं रान होण्यासाठी कि,
त्याच व्यक्तीच्या सहवासाने
जीवनात पालवी फुलवण्यासाठी
प्रेम का होतं?
जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत
तिच्या आठवणीने
प्रेमपथावर एकटं चालण्यासाठी कि,
तिच्या सोबतीने नवीन
आयुष्याच्या सूर्योदयाबरोबर
जीवनाची पहाट सजवण्यासाठी
प्रेम का होतं?
कोणी म्हणतं
प्रेम हि जीवनातील
कठोर परीक्षा आहे आणि
त्या परीक्षेत सर्वच
उत्तीर्ण होत नाहीत
मग मला हे कळत नाही
प्रेम का होतं?

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

Friday, May 7, 2010

माझी सखी



आहे माझी एक सखी
निरागस साधी भोळी,
रूपापेक्षा मनाने सुंदर असून
सर्वांची भरते सुखाने झोळी
माझ्यासारखं तिलाही
कविता करायला फार आवडतं
यमक जुळवता जुळवता
तिला आठवणींच्या गावात पाठवतं
काही नाही तर तिला म्हणे
भांडायला फार आवडतं
भांडताना ती म्हणते
तोंड तीच काहीही बडबडत
तिला रडण माहीतच नाही
कारण ती नेहमी हसतच असते
रागवलं
जरी कोणी तिच्यावर
हसून ती राग शांत करते
तिला हासण्याच कारण विचारलं
कि ती म्हणते
हसण्याने आयुष्य वाढतं
आणि आपल्याला हसताना पाहून
समोरच्याचं दु:ख दूर पळतं
तिचं हे असलं बोलण ऐकून
माझंही हसू अनावर होतं
आणि तिच्याबरोबर हसताना नकळत
माझंही आयुष्य वाढून जातं

(माझ्या एका मैत्रिणीसाठी लिहिलेली हि कविता)
- रवी विश्वासराव (कवी)
(मी - काव्यसंग्रह)

कोणी सांगेल का?



प्रेम म्हणजे काय असतं
हे कोणी मला सांगेल का?
नयनांतून जन्म घेऊन
शब्दसुरांच्या मार्गाने ते
ओठांतून निघून
हृदयापाशी पोहोचणे
याला प्रेम म्हणतात का?
आपल्याला आवडणाऱ्या
एका व्यक्तीच्या सहवासात
मिळालेले आनंदाचे क्षण
हृदयाला टोचल्यावर
जो जिव्हाळा निर्माण होतो
याला प्रेम म्हणतात का?
दोन व्यक्तींनी एकमेकांना समजणं
एकमेकांच्या भावना जाणून
अंत:करणातून सर्वस्वी
त्यालाच आपलं मानणं
याला प्रेम म्हणतात का?
एकाच्या सुखासाठी दुसर्याने
स्वत:च्या जीवनात दु:ख पेरणं
त्या पेरलेल्या दु:खातही
स्वर्गसुखाचा अनुभव घेणं
याला प्रेम म्हणतात का?

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

पावसाळी रात्र होती...


तिच्या आठवणींनी
भिजून चिंब झालेली
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती
पावसाच्या थेंबाने
वादळाच्या गार वार्याने
माझ्या देहाला स्पर्श करून
तिच्या सोबतीची साक्ष देणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
मोकाट सुटलेला वारा
विजेच्या चमकणार्या तारा
छेडत हृदयाच्या धारा
तिचा विरह दूर करण्याचा
प्रयत्न करणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
तिच्या आठवणींचा
माझ्या हृदयावर सतत
घात चालू असताना
बाहेरच्या नभातली वर्षा
माझ्या नयन नभातून
अश्रूंच्या रूपाने बरसणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
बाहेर वादळी वारे
वाहत होते
आणि त्याच वेळी
तिच्या विरहाची वेदना
माझ्या नसानसांत
वादळ निर्माण करणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
त्या पावसाळी रात्री बाहेर
स्मशानशांतता पसरली होती
त्या शांततेच्या रुपात
तिच्या आठवणींना उकरत
माझ्या जीवनात येणार्या
धोक्याची सूचना देणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)