!! आजचे सुभाषित !!

!! आजचे सुभाषित !!
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

Thursday, May 27, 2010

स्वा. विनायक दामोदर सावरकर

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्य जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

वीर सावरकरांनीच पुढे दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट

ग्रंथ आणि पुस्तके

वीर सावरकरांनी ,००० च्या हुन जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. क्वचितच कोणी इतर मराठी लेखकाने इतका अमुल्य ठेवा मराठी भाषेला दिला असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.

इतिहास

  • १८५७ चे स्वातंत्र्यसमर (इ.स. १८५७ च्या युद्धाचा स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास, पहिल्यांदा त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जोडला)
  • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  • हिंदुपदपादशाही

कथा

  • सावरकरांच्या गोष्टी भाग - १
  • सावरकरांच्या गोष्टी भाग - २

कादंबरी

  • काळेपाणी
  • मला काय त्याचे

आत्मचरित्रपर

  • माझी जन्मठेप
  • शत्रूच्या शिबिरात
  • अथांग( आत्मचरित्र पूर्वपीठिका)

लेखसंग्रह

  • मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना - अनुवादित
  • गांधी गोंधळ
  • लंडनची बातमीपत्रे
  • गरमागरम चिवडा
  • तेजस्वी तारे
  • जात्युच्छेदक निबंध
  • विज्ञाननिष्ठ निबंध
  • स्फुट लेख
  • सावरकरांची राजकीय भाषणे
  • सावरकरांची सामाजिक भाषणे

नाटके

  • संगीत उ:शाप
  • संगीत संन्यस्त खड्‌ग
  • संगीत उत्तरक्रिया
  • बोधीसत्व- (अपूर्ण)

कविता

महाकाव्ये

  • कमला
  • गोमांतक
  • विरहोच्छास
  • सप्तर्षी

स्फुट काव्य

  • सावरकरांच्या कविता

No comments:

Post a Comment